गुरुपौर्णिमा (व्यासपूजन)
मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रस्तुत लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच हा उत्सव साजरा करण्याची पद्धत पहाणार आहोत.
तिथी गुरुपौर्णिमा हा उत्सव सर्वत्र आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. (तामिळ प्रदेशात व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस साजरा करतात.) उद्देश गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. त्या गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.
महत्त्व १. गुरुपौर्णिमा या शुभदिनी दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र (हजार) पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वरकृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे. २. ‘गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे; परंतु काळाच्या प्रवाहात रज-तमप्रधान संस्कृतीच्या प्रभावामुळे या महान अशा गुरु-शिष्य परंपरेची उपेक्षा होत आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !
गुरुपौर्णिमा साजरा करण्याची पद्धत प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपरंपरेत महर्षि व्यास यांना सर्वश्रेष्ठ गुरु मानले आहे. सर्व ज्ञानाचा उगम महर्षि व्यास यांच्यापासून होतो, अशी भारतियांची धारणा आहे. कुंभकोणम् आणि शृंगेरी ही शंकराचार्यांची दक्षिण भारतातील प्रसिद्ध पिठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव साजरा होतो. व्यासमहर्षी हे शंकराचार्यांच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे; म्हणून संन्यासी लोक या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात.
१. गुरुपूजनाचा विधी स्नानादी नित्यकर्मे आटोपून ‘गुरुपरम्परासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये ।’ असा संकल्प करतात. एक धूतवस्त्र अंथरून त्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेघा काढतात. ते म्हणजे महर्षि व्यास यांचे व्यासपीठ होय. मग ब्रह्मा, परात्परशक्ती, व्यास, शुकदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांचे त्या व्यासपिठावर आवाहन करून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. याच दिवशी दीक्षागुरु आणि मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.’