Home 2021 May Naag Panchami

नागपंचमी

श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीला भाजी चिरणे, कापणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे यांसारख्या कृती निषिद्ध आहेत; मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. अ. सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. आ. ‘शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला. इ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. ई. पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. ३. नागपूजनाचे महत्त्व अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो. अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।। अर्थ : अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही. आ. ‘७.८.२००७ या दिवशी दुपारी ४.४५ वाजता प्रदक्षिणा घालतांना मला नागपंचमीविषयी पुढील विचार सुचले. ‘नाग ही ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्याशी एकरूप असलेली देवता आहे. नागदेवता ही पृथ्वीचा मेरूदंड आहे. नागपंचमीला नागाची पूजा करण्याचे पुष्कळ महत्त्व असते. अध्यात्मात नागदेवतेला महत्त्व असते; कारण कुंडलीनीही सूक्ष्म-सर्पच आहे. शरिरातील सूक्ष्म-सापांना जागृत करण्यासाठी साधना आवश्यक असते.’ इ. ‘पंचनाग म्हणजेच पंचप्राण. नागपंचमीच्या दिवशी वातावरणात स्थिरता येते. सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी हा योग्य आणि अधिक उपयुक्‍त असा काळ आहे. त्या दिवशी शेषनाग आणि विष्णु यांना पुढील प्रार्थना करावी – ‘आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक्षेपित होणार्‍या तरंगांचे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणार्‍या सर्व अडचणी नष्ट होऊ दे. माझ्या पंचप्राणामध्ये देवतांची शक्‍ती सामावली जाऊन ईश्‍वरप्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यांसाठी तिचा उपयोग होऊ दे. माझ्या पंचप्राणाची शुद्धी होऊ दे.’ नागदेवता ही संपूर्ण जगाची कुंडलीनी आहे. पंचप्राण म्हणजे पंचभौतिक तत्त्वांपासून बनलेले शरिराचे सूक्ष्म-रूप. स्थूलदेह प्राणहीन आहे. यांत वास करणारा प्राणवायू हा पंचप्राणातून येतो ई. नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी, म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागरमंथनासाठी कूर्मावताराला वासुकी या नागाने साहाय्य केले होते. श्रीविष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर नऊ नाग आहेत इत्यादी. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे, म्हणजे नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतिकाचे पूजन करणे होय. उ. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.’ ऊ. ‘नागामध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी तत्त्वे अप्रकट स्वरूपात कार्यरत असतात; मात्र नागपंचमीच्या दिवशी ती प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे पूजकाला त्यांचा अधिक लाभ होतो. सध्या नाग उपलब्ध होत नसल्यामुळे स्त्रिया पाटावर हळदीने नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात. मात्र नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक लाभदायक ठरते; कारण सजीव रूपात ईश्वरी तत्त्वे आकृष्ट करण्याची अधिक क्षमता असते. ए. जगातील सर्व जीवजंतू जगाच्या कार्यासाठी पूरक आहेत. नागपंचमीला नागांच्या पूजेद्वारे ‘भगवंत त्यांच्याद्वारे कार्य करत आहे’, हा विशाल दृष्टीकोन शिकायचा आहे.’ ४. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते. नागपंचमी साजरी करतांना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ अ. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्यालहरी आकर्षित होतात. आ. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्‍तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात. इ. उपवास केल्याने शक्‍ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते. – उ. ‘जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते, तिला शक्‍तीतत्त्व प्राप्त होते. ऊ. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते. ए. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे. ऐ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्‍त ठरतात.