करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी
श्री महालक्ष्मीदेवी
करवीर (कोल्हापूर) हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. श्री महालक्ष्मीदेवीचे हे स्थान आजही जागृत शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. ‘अंबाबाई’ या नावाने सुपरिचित असलेल्या या देवीचे हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास आणि स्थानमाहात्म्य याविषयी या लेखात पाहूया.
श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास
एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्री महालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ करण्याचे आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्री महालक्ष्मीदेवीने मान्य केले.
स्थानमाहात्म्य
कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।
तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च ।।
– देवीभागवत, स्कन्ध ७, अध्याय ३८, श्लोक ५
अर्थ : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मीदेवीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे. देवीभागवताप्रमाणेच पद्मपुराण, स्कंदपुराण आदी पुराणांतही करवीर शक्तीपिठाचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात ‘श्री करवीर माहात्म्य’ असून त्यात नैमिषारण्यात अनेक ऋषींनी सूतांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा सारांश दिला आहे. करवीर नावाचे हे क्षेत्र १०८ कल्पांचे (४,३२,००,००,००० मानवी वर्षे म्हणजे १ कल्प) असून त्याला ‘महामातृक’ असे म्हणतात. येथे श्रीविष्णु श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपाने वास करतात. या करवीर नगरीला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते.
शक्तीपिठांचे महत्त्व
१. शक्तीपिठांतून प्रक्षेपित होणारी निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती आवश्यकतेनुसार
भू, भुव, स्वर्ग आणि ऋषी या लोकांमध्ये सर्व स्तरांवर सूक्ष्म-युद्ध करून तेथील वायूमंडलातील काळ्या
(त्रासदायक) शक्तीचे अन् रज- तम लहरींचे मोठ्या प्रमाणात उच्चाटन करून वायूमंडलाची शुद्धी करत असणे
‘कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी हे शक्तीपीठ आहे. शक्तीपीठ म्हणजे भूलोकातील विशिष्ट ठिकाणी अवतरलेली निर्गुण स्तरावरील चैतन्यदायी शक्ती होय. शक्तीपीठ म्हणजे भूतलावरील साक्षात ईश्वरी शक्तीचा अखंड वहाणारा स्रोत होय. शक्तीपिठाच्या ठिकाणी साक्षात परमेश्वरी भगवती वास करत असल्याने शक्तीपीठ म्हणजे परमेश्वरी भगवतीचे निवासस्थानच होय.
शक्तीपीठ हे पृथ्वीवरील उच्चतम स्तरावरील दैवी शक्तीने भारित असे केंद्र आहे. इतर देवळे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या तुलनेत शक्तीपिठे सर्वाधिक प्रमाणात जागृत अन् वर्षाचे १२ मास प्रत्येक क्षणी अखंड कार्यरत असतात. तसेच त्यांच्यामध्ये आध्यात्मिक स्तरावर सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम अन् सूक्ष्मातीसूक्ष्म अशा चारही टप्प्यांवर कार्य करण्याची अफाट क्षमता असते. त्यामुळे शक्तीपिठांतून प्रक्षेपित होणारी निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती आवश्यकतेनुसार भू, भुव, स्वर्ग आणि ऋषी या लोकांमध्ये सर्व स्तरांवर सूक्ष्म- युद्ध करून तेथील वायूमंडलातील काळ्या (त्रासदायक) शक्तीचे अन् रजतम लहरींचे मोठ्या प्रमाणात उच्चाटन करून वायूमंडलाची शुद्धी करते. तसेच शक्तीपिठे तेथे वास करणार्या जिवांवर आध्यात्मिक उपाय करून त्यांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर करतात. (शक्तीपिठाच्या ठिकाणी दैवी चैतन्य असते. या चैतन्यामुळे भक्तांना अनुभूती येतात, तसेच वाईट शक्तींचा त्रास असणार्या जिवाचा त्रासही घटतो. यालाच त्या जिवावर ‘आध्यात्मिक उपाय होणे’, असे म्हणतात.
२. भूलोक हा सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्या मध्यावर असल्याने
तो ब्रह्मांडातील मध्यबिंदू असणे अन् या ठिकाणी त्रिविध शक्तींचे शक्तीपिठाच्या
रूपाने असणार्या वास्तव्यामुळे त्यांना संपूर्ण ब्रह्मांडात आवश्यकतेनुसार कार्य करणे सोपे जाणे
शक्तीपीठ हे त्रिगुणातीत असते. त्याचे सगुण रूप त्रिपुटी अवस्थेत असते. त्यामुळे सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण शक्तीपिठाच्या आधीन राहून उत्पत्ती, स्थिती अन् लय या तिन्ही स्तरांच्या अधिकतम (कमाल) स्तरावर ब्रह्मांडाच्या आवश्यकतेनुसार कार्य करतात. त्यामुळे शक्तीपिठांच्या ठिकाणी सत्त्वगुणाधिष्ठित श्री महासरस्वती, रजगुणाधिष्ठित श्री महालक्ष्मी आणि तमगुणाधिष्ठित श्री महाकाली यांचे वास्तव्य असते. भूलोक हा सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्या मध्यावर असल्याने तो ब्रह्मांडातील मध्यबिंदू आहे. या ठिकाणी त्रिविध शक्तींचे शक्तीपिठाच्या रूपाने असणार्या वास्तव्यामुळे त्यांना संपूर्ण ब्रह्मांडात आवश्यकतेनुसार कार्य करणे सोपे जाते. भूलोक त्यांच्या आधीन झाल्यावर ब्रह्मांडातील इतर १३ लोक त्यांच्या आधीन होऊन त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत रहातात. त्यामुळे भूलोकात शक्तींनी त्यांची पिठे निर्माण करून त्यांचे नित्यस्वरूपी स्थान ब्रह्मांडाच्या मध्यबिंदूवरच निर्माण केलेले आहे.
३. शक्तीपीठ म्हणजे शक्तीचे मूळ स्थान किंवा बीज, तर शक्तीक्षेत्र
म्हणजे शक्तीपिठातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे कार्यक्षेत्र आणि शक्तीपीठ
अन् शक्तीक्षेत्र या ठिकाणी पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि इतर वाईट शक्ती यांना स्थान नसणे
शक्तीपिठातून निर्गुण-सगुण स्तरावर मोठ्या प्रमाणात शक्ती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होते. शक्ती आणि चैतन्य सभोवतालच्या २५-३० कि.मी. परिसरात पसरून ते क्षेत्र शक्तीने भारित होऊन शक्तीक्षेत्रच निर्माण होते. शक्तीपिठाभोवतीच्या २५-३० कि.मी. परिसरात, म्हणजे शक्तीक्षेत्रात शक्तीपीठक्षेत्राभोवतीचे निर्गुण-सगुण स्तरावरील शक्तीचे संरक्षककवच असते, तर प्रत्यक्ष शक्तीपिठाच्या ठिकाणी देवीच्या सगुण रूपाचे स्थान असल्यामुळे तेथील सभोवतालच्या २.५ किलोमीटरपर्यंत सगुण स्तरावरील शक्ती आणि चैतन्य जास्त प्रमाणात असते आणि २.५ ते ५ कि.मी. अंतरापर्यंत सगुण-निर्गुण स्तरावरील शक्ती अन् चैतन्य कार्यरत असतात.
शक्तीपीठ म्हणजे शक्तीचे मूळ स्थान किंवा बीज आहे, तर शक्तीक्षेत्र म्हणजे शक्तीपिठातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे कार्यक्षेत्र आहे. शक्तीक्षेत्ररूपी संरक्षककवचामुळे बलाढ्य मांत्रिकांना शक्तीपिठावर सरळ (थेट) आक्रमण करता येत नाही. शक्तीपीठ आणि शक्तीक्षेत्र या ठिकाणी पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह आणि इतर वाईट शक्ती यांना स्थान नसते. मांत्रिकांनी शक्तीक्षेत्रात प्रवेश करताच त्यांना शक्तीच्या संरक्षककवचाशी प्रथम युद्ध करावे लागते. येथे कार्यरत असलेल्या निर्गुण स्तरावरील शक्तीमुळे मांत्रिकांना त्यांची निर्गुण स्तरावरील काळी शक्ती वापरून युद्ध करावे लागते. त्यामुळे मांत्रिकांची शक्ती मोठ्या प्रमाणात व्यय (खर्च) होऊ लागते. मांत्रिक स्वतःची शक्ती वाचवण्यासाठी निर्गुण आणि सगुण अशा दोन्ही स्तरांवर प्रयत्न करण्यास प्रारंभ करतात. मांत्रिक ध्यान लावून निर्गुण स्तरावर स्वतःची शक्ती वाचवण्याचा प्रयत्न करतात, तर प्रकट होऊन शक्तीक्षेत्रातील निर्गुण स्तरावरील शक्तीशी लढण्याचा प्रयत्न करतात. शक्तीक्षेत्रात युद्ध करता करता जेव्हा मांत्रिक शक्तीपिठाजवळ पोहोचतात, तेव्हा त्यांची शक्ती मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली असते. त्यामुळे शक्तीपिठातून सगुण-निर्गुण स्तरावरील शक्तीचे प्रक्षेपण करून दैवी शक्ती मांत्रिकांचा नाश करते. मांत्रिकांचा नाश होतांना त्यांच्या जवळील काळ्या शक्तीचे मोठ्या प्रमाणात विघटन होते.
४. शक्तीपिठाद्वारे मांत्रिकांची मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली काळी
शक्ती पुन्हा वाढवण्यासाठी त्यांना ५ वर्षे कठोर उपासना करावी लागणे
शक्तीपीठ आणि त्याचे शक्तीक्षेत्र या ठिकाणी गेल्यामुळे मांत्रिकांची काळी शक्ती मोठ्या प्रमाणात अल्प काळात नष्ट होते. त्यामुळे भक्ताने शक्तीपिठाच्या दर्शनाला जाणे, म्हणजे निर्गुण-सगुण स्तरावरील मोठ्या आध्यात्मिक उपायांमध्ये सहभागी होण्यासारखे आहे. शक्तीपिठाद्वारे मांत्रिकांची मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली काळी शक्ती पुन्हा वाढवण्यासाठी त्यांना ५ वर्षे कठोर उपासना करावी लागते.
५. शक्तीपिठाजवळ वास करणार्या जिवांचे दैवी शक्तीद्वारे
पालनपोषण होऊन त्यांचे ऐहिक आणि पारलौकिक जीवनही चांगले होणे
शक्तीपिठामुळे संपूर्ण शक्तीक्षेत्राचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. शक्तीपिठातील शक्ती शक्तीक्षेत्राचे आणि तेथे भावपूर्ण साधना करणार्या प्रत्येक जिवाचे पालनपोषण करत असते. तेथील जिवांवर दैवी शक्तीची सदैव कृपा राहून आधिभौतिक (भौतिक कारणांमुळे उद्भवणारे रोग; धरणीकंप, अवर्षण आदी संकटे इ.), आधिदैविक (ग्रहबाधा, ऋषीमुनींचे शाप, देवतांचा कोप इ.) आणि आध्यात्मिक (भूत-पिशाचादी वाईट शक्तींचे त्रास, प्रारब्ध इ.) स्तरांवरील त्रासांपासून त्यांचे संरक्षण होते. (एका विचारसरणीनुसार आधिदैविक त्रासांत वर उल्लेखलेले ‘आध्यात्मिक’ त्रासही अंतर्भूत आहेत. ‘आध्यात्मिक’ त्रास म्हणजे वात, पित्त आणि कफ यांच्यामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक त्रास. – संकलक) या क्षेत्रातील एखाद्या जिवाला आध्यात्मिक त्रास असेल, तर त्यापासूनही जिवाला मुक्ती मिळू शकते. त्यामुळे येथील जिवांचे ऐहिक जीवन सुखी होते. तसेच त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन त्यांचे पारलौकिक जीवनही चांगले होते.
६. शक्तीपीठ आणि शक्तीक्षेत्र या ठिकाणी रहाणार्या जिवांना तेथे वास
करण्याची ईश्वराने सुवर्णसंधी दिलेली असणे आणि या संधीचा पूर्ण लाभ
करून घेण्यासाठी तेथील जिवांनी सातत्याने साधना करणे आवश्यक असणे
भाविकांच्या मनातील शक्तीपिठाविषयीचा भाव उणावला, तर तेथील दैवी शक्ती अल्प (कमी) प्रमाणात कार्यरत होते आणि अधिक (जास्त) प्रमाणात सुप्तावस्थेत रहाते. शक्तीपीठ आणि शक्तीक्षेत्र या ठिकाणी रहाणार्या जिवांना तेथे वास करण्याची ईश्वराने सुवर्णसंधी दिलेली असते. या संधीचा पूर्ण लाभ करून घेण्यासाठी तेथील जिवांनी सातत्याने साधना केली पाहिजे अन् ती वाढवलीही पाहिजे.’
स्तोत्रपठण हा उपासनेचाच एक भाग. येथे श्री महालक्ष्मीदेवीच्या भक्तांसाठी ‘श्री महालक्ष्म्यष्टक’ स्तोत्र देत आहोत.
स्तोत्र वाचन करण्या साठी पुढे क्लिक करा ।। श्री महालक्ष्म्यष्टकम् ।।
Leave a Comment