गुरूंच्या आज्ञेचे पालन करून त्यांचे मन जिंकणारा उपमन्यू !
बोधकथा
धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले. उपमन्यू आनंदाने अर्धी भिक्षा धौम्यऋषींना अर्पण करू लागला. उरलेल्या अर्ध्या भिक्षेतही उपमन्यू संतुष्ट राहू लागला. काही काळाने धौम्यऋषींनी त्याला मिळालेली संपूर्ण भिक्षा गुरूंना अर्पण करण्यास सांगितली. उपमन्यूने तसे केले. अन्नग्रहण न करताही उपमन्यूची प्रकृती उत्तमच आहे, हे पाहून धौम्यऋषींनी त्याला विचारले, तू काय सेवन करतोस ? त्याने सांगितले, गुरुदेव, मी रानात गायीचे दूध पितो. तेव्हा धौम्यऋषी म्हणाले, अरे, त्यामुळे दूध उष्टे होते. ते पिऊ नकोस. धौम्यऋषींची ही आज्ञाही उपमन्यूने आनंदाने मान्य केली.
उपमन्यू दुसर्या दिवशी गायी घेऊन रानात गेला. फार भूक लागल्यावर मात्र त्याला रहावले नाही. त्याने रुईचा चीक काढून खाल्ला. तो चीक डोळ्यांत उडाल्याने त्याला अंधत्व आले. सायंकाळी आश्रमाकडे गायी घेऊन येत असता तो विहिरीत पडला. रात्र फार झाली. उपमन्यू परत न आल्याने धौम्यऋषी त्याचा शोध घेत रानात हाका मारत आले. त्यांच्या हाका ऐकून विहिरीतून उपमन्यूने ओ दिली. धौम्यऋषींनी त्याला वर काढले. त्याच्या तोंडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर धौम्यऋषी प्रसन्न झाले. गुरूंच्या सांगण्यावरून उपमन्यूने देवांचे वैद्य आश्वनीकुमार यांना प्रार्थना केली. आश्वनीकुमारांनी त्याला दृष्टी दिली आणि महाज्ञानी होशील, असा आशीर्वादही दिला !
मुलांनो, उपमन्यूने गुरूंचे काटेकोरपणे आज्ञापालन करतांना स्वत:चा विचार केला नाही; म्हणूनच तो गुरूंचा आवडता शिष्य बनला आणि त्याला देवाचा आशीर्वादही मिळाला. तुम्हीही शिक्षकांचे आज्ञापालन करून त्यांचे मन जिंका !
गुरूंच्या आज्ञापालनासाठी
स्वत:चा जीव धोक्यात घालणारा शिष्य आरुणी !
सद्गुरू शक्ती ज्योतिष कार्यालय
धौम्यऋषींच्या आश्रमात आरुणी नावाचा त्यांचा एक शिष्य होता. एके दिवशी मोठा पाऊस पडू लागला. पावसाच्या पाण्यामुळे आश्रमाच्या शेताचा बांध फुटून शेत वाहून जाऊ नये; म्हणून धौम्यऋषींनी शिष्यांना सांगितले, जा ! काळजी घ्या. शेताचा बांध फुटू देऊ नका.
आरुणी आणि काही शिष्य शेतातील बांधाजवळ आले. फुटलेला बांध त्या सर्वांनी नीट करावा अन् पावसाच्या पाण्याने पुन्हा तो फुटून जावा, असे बरेच वेळा घडले. पाऊस काही थांबत नव्हता. रात्र झाली. सर्व शिष्य कंटाळून परत गेले. दिवसभर कष्ट केल्यामुळे थकलेले सर्व शिष्य गाढ झोपी गेले. सकाळी पाऊस थांबला, तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की आरुणी आश्रमात दिसत नाही. हे वृत्त धौम्यऋषींच्या कानावर घालण्यात आले. धौम्यऋषी म्हणाले, चला, आपण शेतात जाऊन बघूया. शेतात आल्यावर आरुणी कोठे दिसेना. धौम्यऋषींनी मोठ्याने विचारले, बाळ आरुणी, तू कोठे आहेस ? बांधाच्या दिशेकडून उत्तर आले, गुरुजी, मी येथे आहे ! पहातात तर काय ? घातलेला बांध टिकेना; म्हणून स्वत: आरुणीच तेथे आडवा पडलेला त्यांना दिसला ! गुरुजींनी त्याला उठवले आणि प्रेमाने जवळ घेतले.
मुलांनो, गुरूंचे आज्ञापालन, हे शिष्याचे कर्तव्यच आहे. तुम्हीही आरुणीसारखे आज्ञापालन करून गुरुजींचे लाडके बना !
Leave a Comment