संवत्सरिक श्राद्ध (वर्ष श्राद्ध )
वर्षश्राद्धामुळे त्या त्या विशिष्ट लिंगदेहाला गती मिळण्यास साहाय्य होते. असे झाल्याने त्या त्या व्यक्तीचे प्रत्यक्ष व्यष्टी स्तरावरील ऋण फिटण्यास साहाय्य होते. वर्षश्राद्ध करणे, ही एक हिंदु धर्माने वैयक्तिक स्तरावर नेमून दिलेली ऋण फेडण्याची व्यष्टी उपासनाच आहे, तर पितृपंधरवड्याच्या निमित्ताने समष्टी स्तरावर पितरांचे ऋण फेडणे, हा समष्टी उपासनेचा भाग आहे. व्यष्टी ऋण हे त्या त्या लिंगदेहाप्रती प्रत्यक्ष कर्तव्यपालन शिकवते, तर समष्टी ऋण हे एकाच वेळी व्यापक स्तरावर देवाणघेवाण फेडते.
आपल्याशी घनिष्ट संबंध असणार्या आधीच्या १-२ पिढ्यांतील पितरांचे आपण श्राद्ध करतो; कारण या पिढ्यांसमवेत आपले प्रत्यक्ष कर्तव्यस्वरूप देवाण-घेवाण संबंध असतात. इतर पिढ्यांपेक्षा या पितरांमध्ये कुटुंबात अडकलेल्या आसक्तीविषयक विचारांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे हे प्रत्यक्ष बंधन जास्त तीव्रतेचे असल्याने ते तोडण्यासाठी वैयक्तिक स्वरूपात वर्षश्राद्धविषयक विधी करणे आवश्यक असते. त्यामानाने त्या आधीच्या इतर पितरांचे आपल्याशी असणारे बंध अल्प तीव्रतेचे असल्याने त्यांच्यासाठी पितृपक्ष विधी सामायिक स्वरूपात करणे इष्ट ठरते; म्हणून वर्षश्राद्ध, तसेच पितृपक्ष हे दोन्हीही विधी करणे आवश्यक आहे.’
हा काल सर्वसाधारण जिवांना श्राद्धातील मंत्रांतून उत्पन्न होणार्या लहरी ग्रहण करण्यास पोषक असतो. या कालामध्ये रज-तम कणांचा संचार किंवा प्रवाह हा गतिमान अवस्थेत असल्याने या काळात लिंगदेहांना दिलेले अन्नादी घटक सूक्ष्म वायूच्या रूपात अल्प कालावधीत वाहून नेले जाऊन त्यांची संतुष्टता करतात. हा काल पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित लहरींच्या स्तरावर कार्यमान असल्याने या रज-तम कणांच्या प्रवाहातून आपल्या वासना संतुष्ट करून घेणे मृतात्म्यांना सोपे जाते.