दशक्रिया
दशक्रिया हा हिंदू चालीरीतींनुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी आहे. व्यक्तीच्या निधनानंतर अस्थिसंचयन करण्यापासून ते दहा दिवसापर्यंत विविध विधी यामध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये स्नान, मृत्तिकास्नान, एकपिंडदान, विषमश्राद्ध, वपन, पाच मडक्यांवर पोळ्या, छत्र, पादुका, कावळा शिवणे अशा विविध विधींचा समावेश होतो.[१] हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मृत्युनंतर दहा दिवस आत्मा पृथ्वीतलावर वास करतो. दहावा विधी केल्यानंतर त्याच्या इच्छा तृप्त न झाल्यास त्याला मुक्ति मिळत नाही. इच्छा राहिल्या नसल्यास दहाव्याच्या भाताच्या पिंडाला कावळा शिवल्यास मुक्ति मिळते, कारण कावळ्याच्या रूपात आत्मा असतो अशी धारणा आहे. परंतु कधीकधी कावळा शिवत नाही अशा वेळेस ब्राह्मण दर्भाचा कावळा स्पर्श पिंडाला करून कावळा शिवला असे मानतात.
दशक्रियेविषयीची खालिल आख्यायिका प्रसिद्ध आहे. एकदा राम वनवासात आरामात झोपले असतांना तेथे एक कावळा येतो आणि तो सीतेला त्रास देत असतो. काही केल्या तो तिचा पिच्छा सोडत नाही. तेव्हा त्रासून सीता रामाला उठवते आणि कावळा कसा त्रास देतो ते सांगते. त्यावेळेस रामाकडे धनुष्यबाण नसतो, म्हणून तो जवळच पडलेली एक गवताची काडी मंत्रून कावळावर फेकतो, तर ती काडी (मंत्रीत दर्भ) कावळ्याच्या एका डोळ्याचा वेध घेते आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो म्हणून त्याला ‘एकाक्ष’ म्हणतात. त्याच वेळेस सीता त्याला शाप देते की तू एकाक्ष असल्याने तुला सर्वजण अशुभ मानतील, तेव्हा कावळा गयावया करून उःशाप मागतो तेव्हा त्याची दया येऊन सीता त्याला उ:शाप देते की, मनुष्य मृत झाल्यावर त्याच्या दहाव्याच्या पिंडाला तू स्पर्श केल्याशिवाय त्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होणार नाही. आणि शिवाय ही दर्भाची काडी सुद्धा त्या
माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे दाहकर्म व श्राद्ध हे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था, प्रेम, सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधींकडे पाहिले पाहिजे असे वाटते. भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात मृत्यूनंतर केल्या जाणार्या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात. दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-र्या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.
अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस. या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने. आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
गरुड पुराणात सांगितले आहे की शव उचलण्यापूर्वी घरात एक पिंड द्यावा. शवयात्रा सुरु करण्यापूर्वी दरवाजात दुसरा पिंड द्यावा. शवयात्रा चौकात आल्यावर एक पिंड द्यावा. स्मशानात विसाव्याच्या ठिकाणी एक पिंड द्यावा आणि चितास्थानी एक पिंड द्यावा, असे एकूण पाच पिंड द्यावेत. त्यानंतर दहनाचा विधी करावा. त्यावेळी पवित्रीकरण, प्राणायाम, संकल्प, जानव्याचे अपसव्य, यमाला नमस्कार, यमाची स्तुती, स्मशानभूमीची प्रार्थना, स्मशानातीला जलाची प्रार्थना, भूमिप्रोक्षण, अग्निस्थापना, रेखाकरण, चितीकरण, सूक्त पिंडदान (प्रेताच्या कपाळ, मुख,हात व पाय या ठिकाणी सातूचे पिंड ठेवणे, शवाला पाणी पाजणे, अग्निसंस्कार, अग्नी, पितर व मृताला प्रार्थना, घटाचा स्फोट, अप्रदक्षिणा, तिलांजली असे सर्व विधी केले जातात