Home 2021 May Navratre
IMG-20190804-WA0000

नवरात्र

१. तिथी आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी. २. इतिहास अ. रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदाने रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. आ. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासुराला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले.
३. महत्त्व अ. जगात जेव्हा जेव्हा तामसी, आसुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्त्विक अन् धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात, तेव्हा देवी धर्मसंस्थापनेकरता पुनःपुन्हा अवतार घेते. त्या देवतेचे हे व्रत आहे. आ. नवरात्रीत देवीतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीच्या काळात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा नामजप अधिकाधिक करावा.
४. व्रत करण्याची पद्धत नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो. अ. घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राशेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी. आ. नवरात्रमहोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका आणून तिचा दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात (पाच किंवा) सप्तधान्ये घालावी. जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये होत.
इ. मृत्तिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात. ई. सप्तधान्ये आणि कलश (वरुण) स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत. तेही येत नसल्यास त्या त्या वस्तूचे नाम घेऊन ‘समर्पयामि’ म्हणून नाममंत्रांचा विनियोग करावा. कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी. उ. नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती, तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती. प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते.
ऊ. अखंड दीपप्रज्वलन, त्या देवतेचे माहात्म्यपठन (चंडीपाठ), सप्तशतीपाठ, देवीभागवत, ब्रह्मांडपुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण, ललिता-पूजन, सरस्वतीपूजन, उपवास, जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यांनुसार नवरात्रमहोत्सव साजरा करावा. देवीपूजनाशी संबंधित अधिक माहितीसाठी पहा, देवीपूजनाशी संबंधित उपासनेच्या काही कृती, देवीची ओटी कशी भरावी ?, देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन कसे करावे ? ए. पूजकाला उपवास असला, तरी देवतेला नेहमीप्रमाणे अन्नाचा नैवेद्य दाखवावा. ऐ. या काळात उत्कृष्ट आचाराचे एक अंग म्हणून श्मश्रू न करणे (दाढीमिशीचे केस आणि डोक्यावरील केस न कापणे), कडक ब्रह्मचर्यपालन, पलंगावर अन् गादीवर न झोपणे, सीमा न उल्लंघणे, पादत्राणे न वापरणे अशा विविध गोष्टींचे पालन केले जाते.
ओ. नवरात्राच्या संख्येवर भर देऊन काही जण शेवटच्या दिवशीही नवरात्र ठेवतात; पण शास्त्राप्रमाणे शेवटच्या दिवशी नवरात्र उठणे आवश्यक आहे. त्या दिवशी समाराधना (भोजनप्रसाद) झाल्यावर वेळ उरल्यास त्याच दिवशी सर्व देव काढून अभिषेक आणि षोडशोपचार पूजा करावी. हे शक्य नसल्यास दुसर्‍या दिवशी सर्व देवांवर पूजाभिषेक करावा. औ. देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी पेरलेल्या धान्याची झालेली रोपे देवीला वाहतात. त्या रोपांना ‘शाकंभरीदेवी’ म्हणून स्त्रिया डोक्यावर धारण करून विसर्जनाला घेऊन जातात.
अं. नवरात्र बसवतांना आणि उठवतांना देवांचे ‘उद्वार्जन’ अवश्य करावे. उद्वार्जनासाठी नेहमीप्रमाणे लिंबू, भस्म इत्यादी वस्तू वापराव्यात. रांगोळी किंवा भांडी घासायचे चूर्ण वापरू नये. क. शेवटी स्थापित घट आणि देवी यांचे मनोभावे उत्थापन (विसर्जन) करावे. ख. नवरात्र किंवा इतर धार्मिक विधींत दिवा अखंड तेवत राहणे, हा पूजाविधीचा महत्त्वाचा भाग असतांना तो वारा, तेल न्यून (कमी) पडणे, काजळी धरणे इत्यादी कारणांमुळे विझल्यास ती कारणे दूर करून दिवा परत प्रज्वलित करावा आणि प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्या देवतेचा एकशे आठ किंवा एक सहस्र आठ वेळा नामजप करावा.
नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा ! गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा, ‘गरबा खेळणे’. पूर्वी ‘गरबा’ या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून गरबा खेळला जातो. गरब्याच्या निमित्ताने व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण इत्यादी प्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे. सनातन काही वर्षांपासून या अपप्रकारांविरुद्ध जनजागृती चळवळ राबवते. यात तुम्हीही सहभागी व्हा 

१. कुमारी

हिच्या पूजेत फुले, फुलांच्या माळा, गवत, पाने, झाडांच्या साली, कापसाचे धागे, भंडारा (हळद), शेंदूर, कुंकू इत्यादींना महत्त्व असते. लहान मुलींना आवडतात अशा गोष्टी या देवीला अर्पण करतात.

 

२. रेणुका, अंबाबाई आणि तुळजाभवानी

विवाहासारख्या एखाद्या विधीनंतर या कुलदेवता असलेल्यांच्या घरी देवीचा गोंधळ घालतात. काही जणांच्या घरी विवाहादी कार्य नीटपणे पार पडले म्हणून सत्यनारायणाची पूजा करतात किंवा कोकणस्थ ब्राह्मणांत देवीचे बोडण भरतात, तसेच हे आहे.

 

३. अंबाजी

गुजरातमधील अंबाजीच्या (अंबामातेच्या) देवळात दिव्यासाठी तेल वापरीत नाहीत. तेथे तुपाचा नंदादीप (अखंड) तेवत असतो.

 

४. त्रिपुरसुंदरी

ही एक तांत्रिक देवता आहे. हिच्या नावावर एक पंथ प्रचलित आहे. त्या पंथाची दीक्षा घेतल्यावरच हिची उपासना करता येते, असे त्या पंथाचे मत आहे.

 

५. त्रिपुरभैरवी

एक तांत्रिक देवता. धर्म, अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती करून देणारी ही देवता आहे, असे मानले जाते. ही शिवलिंग भेदून बाहेर आली आहे. कालिकापुराणात हिचे ध्यान (वर्णन) दिले आहे. सर्व रूपांत भैरवी हे त्रिपुरेचे प्रभावी रूप समजले जाते. तिची पूजा डाव्या हाताने करतात. तिला लाल रंगाच्या (रक्तवर्ण) मदिरा, लाल फुले, लाल वस्त्रे आणि शेंदूर या वस्तू प्रिय आहेत. (५)

 

६. महिषासुरमर्दिनी

देवीची शक्ती सहन करण्याची क्षमता नसल्यास प्रथम शांतादुर्गेचे आवाहन करतात, नंतर दुर्गेचे आणि शेवटी महिषासुरमर्दिनीचे करतात. यामुळे देवीची शक्ती सहन करण्याची शक्ती टप्प्याटप्प्याने वाढल्याने महिषासुरमर्दिनीची शक्ती सहन करता येते.

 

७. काली

बंगालमध्ये कालीची उपासना प्राचीन कालापासून प्रचलित आहे. पूर्णानंदांचा श्यामारहस्य आणि कृष्णानंदांचा तंत्रसार हे दोन ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. या पूजेत सुरा (मद्य) ही अत्यावश्यक वस्तू मानली आहे. मंत्राने शुद्ध करून तिचे सेवन केले जाते. कालीपूजेसाठी वापरले जाणारे कालीयंत्र त्रिकोण, पंचकोन किंवा नवकोन करावे, असे कालिकोपनिषदात सांगितले आहे. काही वेळा ते पंधरा कोनांचेही करतात. कालीपूजा कार्तिक कृष्णपक्षात, विशेष करून रात्रीच्या वेळी फलप्रद सांगितली आहे. या पूजेत कालीस्तोत्र, कवच, शतनाम आणि सहस्रनाम यांचा पाठ विहित आहे.

 

८. चामुंडा

आठ गुप्ततर योगिनी मुख्य देवतेच्या नियंत्रणाखाली चक्रात विश्‍वाचे संचलन, वस्तूंचे उत्सर्जन, परिणाम इत्यादी कार्ये करतात. संधीपूजा नावाची एक विशेष पूजा अष्टमी आणि नवमी या तिथींच्या संधीकाली करतात. ही पूजा दुर्गेच्या चामुंडा या रूपाची असते. त्या रात्री गायन-वादन आणि खेळ यांच्या योगाने जागरण करतात.

 

९. दुर्गा

श्री दुर्गामहायंत्र हे श्री भगवतीदेवीचे (दुर्गेचे) आसन आहे. नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करतात.

 

१०. उत्तानपादा

ही मातृत्व, सर्जन तथा विश्‍वनिर्मिती या त्रिगुणांनी युक्त आहे. छिन्नमस्ता किंवा लज्जागौरी या देवीची मूर्ती भूमीवर पाठ टेकून ठेवून, उताण्या स्थितीत दुमडलेले पाय पूजकाकडे ठेवून पुजण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली दिसते. शिवपिंडीखालच्या शाळुंकेची जी रचना असते, तशाच अवस्थेत ती पुजली गेलेली दिसते. तिला जलधारांचा अभिषेक केल्यानंतर ते पाणी वाहून जाण्यासाठी एक मार्गही दिलेला दिसतो. शिवपिंडीच्या या मार्गास महाशिवाच्या महाभगेचा महामार्ग, असे म्हणतात.

संदर्भ :सद्गुरु शक्ती ज्योतिष कार्यालय