उदक शांती
आपल्या सर्वांना उदक शांती माहीत आहे, पण त्याबद्दलची फारशी माहिती बहुतेक जणांना नसते. उदक शांती म्हणजे काय? ती शांती केव्हा करतात? ती शांती केल्याने काय होते? यांसारखे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. कदाचित तुम्हालाही पडत असतील. तर चला जाणून घेऊया उदक शांतीबद्दल…
अर्थ उदक म्हणजे पाणी. या पृथ्वीवर पाण्याशिवाय कुठल्याही गोष्टीचे शुद्धीकरण होऊ शकत नाही उदा. कपडे धुणे, भांडी घासणे, अंघोळ करण्यासाठी पाणीच लागते. पाण्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. प्रत्येक सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही. असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या जीवनावश्यक पाण्याला अभिमंत्रित करून त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण करणे म्हणजे उदक शांती.
2फायदे नवीन घरात आपण वास्तुशांती करून राहायला जातो. पण जर मुहूर्त नसेल तर उदक शांती करून शुद्धीकरण झाल्यावर तेथे आपण राहायला जाऊ शकतो. नवीन व्यवसाय-व्यापाराचे स्थान असेल ते आधी कोणी कसे वापरले हे आपणास माहिती नसते. तिथेसुद्धा आपण उदक शांती करू शकतो. घरी सुतक संपल्यावर त्रयोदश श्राद्ध करून मग चौदाव्या दिवशी आपण शुद्धीकरणासाठी उदक शांती करतो. उदक शांतीचे अजून महत्त्वाचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होउन दैवी ऊर्जेचे संपादन होते. घरातील अशांतता नाहीशी होउन प्रसन्न वातावरण निर्माण होते.
विधी उदक शांती करताना गुरूजी गणपती पूजन व पुण्याहवाचन करतात. प्रधान पीठावरील कलशास गुग्गुळाने धुपवितात. मग ब्रह्मदेवाची स्थापना करतात. गुग्गुळाचा धूर पूर्ण घरात फिरवतात. वेदांचे मंत्र म्हणून पाणी अभिमंत्रित केले जाते. उदक शांतीमध्ये तीन प्रकारे शुद्धीकरण प्रक्रिया होते. सर्वप्रथम १) गुग्गुळाचा धूर, त्यानंतर २) वेदमंत्रांची स्पंदने, नंतर ३) पाण्याने सिंचन करून केले जाणारे शुद्धीकरण.